बीड : जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून कोणी बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला दिल्यास त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिला आहे. ही माहिती आरोग्य विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.
बीड जिल्हा हा स्त्री भ्रूणहत्येमुळे देशभर चर्चेत होता; परंतु आता हा कलंक पुसण्यात प्रशासनाला यश येत आहे. २०१०-११ साली मुलींचा जन्मदर हा १ हजार मुलांमागे ८१० एवढा होता. नंतर तो २०१८-१९ मध्ये ९६१ वर पोहोचला; परंतु कोरोनाकाळात जन्मदर घटल्याची कबुली खुद्द पीसीपीएनडीटी कायदा १९९४ च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी फेब्रुवारी महिन्यातील एका पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. राज्यस्तरावरून विशेष मोहीम राबवून तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सामान्य नागरिकांना आवाहन करून गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास शासनाकडून १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. आता या आवाहनाला किती लोक प्रतिसाद देतात, याकडे लक्ष लागले आहे.
कोठे द्यायची माहिती ?जिल्ह्यातील कोणतेही सोनोग्राफी सेंटर, संस्था, व्यक्ती अथवा डॉक्टर हे गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती मिळाल्यास जिल्हा शल्य चिकित्सक अथवा उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून अथवा कॉल करून माहिती देऊ शकता. तसेच १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क करून माहिती देऊ शकता. आपण दिलेल्या माहितीची खात्री करून आरोग्य विभागाच्या विशेष पथकामार्फत कारवाई केली जाणार असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले आहे.
असा आहे जन्मदरवर्ष -लिंग गुणोत्तर२०१८-१९ : ९६१२०१९-२० : ९४७२०२०-२१ ९२८