गंगामसला येथील शंभर खाटांचा प्रस्ताव
माजलगाव : कोरोना रुग्णांची ग्रामीण भागातील वाढती संख्या पाहता येथील पंचायत समितीने आता पुढाकार घेतला असून तालुक्यातील गंगामसला येथे १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात यावे, असा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. मंगळवारी गंगामसला पंचायत समिती सदस्य शशांक सोळंके यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्याचा अतिरिक्त ताण शहरातील कोविड सेंटरवर पडताना दिसत आहे. जवळपास तालुक्यात ३९ गावात पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण अस्तित्वात आहेत. तर अनेक जण होम क्वाॅरंटाईन आहेत. अशा बिकट परिस्थितीत पंचायत समिती, आरोग्य प्रशासन नियोजन करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कंटेनमेंट झोनबाबत पंचायत समिती नियोजन करण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्या अनुषंगाने मंगळवार रोजी काही पंचायत समिती सदस्यांनी शशांक सोळंके यांच्या पुढाकारातून पंचायत समिती कार्यालयात यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली.
दरम्यान, यावेळी गंगामसला येथे शशांक सोळंके यांच्या मालकीच्या अजित इंग्लिश स्कूल शाळेत १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पुढं करण्यात आला. या कोविड सेंटरमध्ये पंचायत समितीमार्फत सुविधा उभारण्यात येणार असून या कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांच्या जेवणाच्या सोयीसाठी एखाद्या समाजसेवी संस्थेच्या पाठबळाची गरज पडणार आहे. त्या दिशेने आम्ही काम करत आहोत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच लवकरच गंगामसला येथे कोविड सेंटर सुरू होणार आहे,अशी माहिती गंगामसला पंचायत समिती सदस्य शशांक सोळंके यांनी दिली.