- नितीन कांबळेकडा- रविवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील उंदरखेल परिसरातील तलावाच्या जवळ एका शेतात दीड ते दोन वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या बिबट्याला अन्नपाणी मिळाले नसल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावाजवळ सुंदर सोनाजी पाखरे यांच्या शेतात जखमी अवस्थेतील बिबट्या असल्याच्या माहितीवरून रविवारी सायंकाळी वन कर्मचारी शेतात केले. यावेळी त्यांना मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. पाहणीत बिबट्याच्या अंगावर जखम आढळून आली. या जखमेमुळे शिकार करता येत नसल्याने अन्नपाण्याविना दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज सुलेमान देवळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी धनजंय राजगुडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आज आष्टीच्या वनविभागाने पंचनामा करून मृत बिबट्याचे पशुवैद्यकीय टीमने शवविच्छेदन केले. मंगळवारी शवविच्छेदन अहवाल येताच मृत्येचे कारण समोर येईल. पिंपरी घाटा येथील वनपरिसरात बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढगे, वनपाल बाबासाहेब मोहळकर, वनरक्षक ए.एस.काळे,याच्यासह वन कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी धनजंय राजगुडे याच्या टीमच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.