लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : कोविड सेंटरच्या नावाखाली येथील मागासवर्गीय शासकीय मुलींचे वसतिगृह रिकामे करण्यात आले असून, येथील विद्यार्थिनींची तात्पुरती व्यवस्था मूकबधीर निवासी विद्यालयात करण्यात आली आहे. मात्र, या मुलींना याठिकाणी सुविधा मिळणे मुश्कील झाल्याने वसतिगृहातील कोविड केअर सेंटर बंद करावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी वसाहत येथे शासनाने मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह उभारले आहे. याठिकाणी सर्व सुविधा, मुलींना सुरक्षितता, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, वसतिगृहाला संरक्षक भिंत आहे. परंतु, गेल्या ३ दिवसांपासून कोविड सेंटरच्या नावाखाली याठिकाणी असलेल्या अकरा मुलींची जवळच असलेल्या मूकबधीर निवासी विद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी या मुलींना कोणत्याही प्रकारची सुविधा तसेच सुरक्षितता नाही. त्यामुळे अशाठिकाणी या विद्यार्थिनींना का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणासाठी आई - वडिलांपासून दूर आलेल्या या मुलींवर यामुळे अन्याय होत असून, त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. या विद्यार्थिनींची होणारी गैरसोय लक्षात घेत, ऑल इंडिया पँथर सेनेने वसतिगृहातील कोविड सेंटर बंद करून मागासवर्गीय दलित मुलींचे वसतिगृह पूर्वीप्रमाणे सुरू करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष भीमराव कदम, जिल्हा उपाध्यक्ष किशोर टाकणखार, तालुकाध्यक्ष पप्पू शिंदे, शहराध्यक्ष दादाराव तोडके, राजेंद्र वाघमारे, माऊली वाघमारे आदींनी दिला आहे.