बीड : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे जवळपास १० महिन्यांपासून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना भेटता आले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भेटी बंद आहेत. मोबाइल, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या भेटी घडवून आणल्या जात आहेत.
जिल्हा कारागृहात दररोज सरासरी २०० पेक्षा जास्त कैदी बंदी असतात. तसेच कोरोनामुळे ४० कैद्यांची क्षमता असलेले तात्पुरते कारागृह तयार केले. येथेही ५० पेक्षा जास्त आरोपी कायम असतात. परंतु एकदा का हे आरोपी कारागृहात बंद झाले तर त्यांना आजार वगळता इतर कोणत्याच कारणाने बाहेर निघता येत नव्हते. नातेवाइकांच्या भेटीगाठीही बंद केल्या होत्या.
हाच धागा पकडून कारागृह प्रशासनाने या कैद्यांना नातेवाईक आणि वकिलांना संपर्क साधण्यासाठी मोबाइल व काॅइन बॉक्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याचा खर्च कैद्यांच्या दैनंदिन खर्चातून घेतला जात असे. कैद्यांची गर्दी आणि वेळेच महत्त्व लक्षात घेता एका कैद्याला कमीत कमी ५ मिनिटे बाेलण्यासाठी वेळ दिला जात होता. कैद्यांनीही शांततेत संपर्क साधला.
दरम्यान, आता नव्यानेच कारागृह अधीक्षक म्हणून विलास भोईटे रुजू झाले आहेत. परंतु ते येण्यापूर्वी वरिष्ठ तुरुंग अधिकारी एम.एस. पवार यांनीच अधीक्षकांचा पदभार सांभाळला होता. येरवाडा येथील अनुभवाचा त्यांना बीडमध्ये पुरेपूर फायदा झाला. संजय कांबळे यांनीही साथ दिली. परंतु कोरोनाने त्यांचा घात केला, ते मृत्यू पावले होते.
कधी मोबाइल फोन तर कधी व्हिडिओ कॉलिंग
जिल्हा कारागृहात प्रत्येक आठ दिवसाला कैद्यांना आपल्या नातेवाइकांशी बोलण्याची संधी दिली जात असे. यासाठी एक रुपया टाकून बोलण्यासाठी कॉइन बॉक्स उपलब्ध केला होता. तसेच ज्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे, अशांसाठी ॲन्ड्रॉइड मोबाइलही उपलब्ध केला हाेता. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे कैद्यांनी नातेवाइकांशी संवाद साधला.
बाहेरचे साहित्य आत नेण्यास बंदी
कोरोनाच्या भीतीपोटी गाठीभेटी बंद केल्या होत्या. तसेच बाहेरचे साहित्यही कारागृहात नेण्यास बंदी घालण्यात आली होती. अत्यावश्यक साहित्य अथवा इतर महत्त्वाच्या बाबी वगळता काहीच आतमध्ये नेले जात नव्हते. जे साहित्य आत जाते, त्यालाही सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण केले जात होते.
एका कैद्याला पाच मिनिटांचा वेळ
कोरोनामुळे कैद्यांशी नातेवाइकांना भेटीगाठी बंद केल्या होत्या. कैद्यांना नातेवाइकांशी बोलता यावे, यासाठी ऑडिओसाठी कॉइन बॉक्स व व्हिडिओ काॅलिंगसाठी ॲन्ड्रॉइड मोबाइल उपलब्ध. केला होता. कमीत कमी पाच मिनिटे एकाला बोलण्यास वेळ होता.
- एम.एस. पवार
वरिष्ठ तुरुंग अधिकारी, कारागृह बीड