परळी : पीपीई किट घालून फिरणाऱ्या एका भोळसर व्यक्तीमुळे मंगळवारपासून शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. याची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. बुधवारी नेहरू चौकात तो आढळून आला. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यास दुसरे कपडे देऊन पीपीई किट काढून घेतला. मात्र, कोरोना उपचारात सुरक्षितेसाठी वापरण्यात येत असलेले पीपीई किट, हातमोजे, मास्क त्याच्याकडे कसे आले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीपीई किट घालून एका भोळसर व्यक्तीने शहरात मंगळवारी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार समजताच नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. मात्र, बुधवारी सकाळी नेहरू चौकात तो व्यक्ती एका झाडाखाली आढळून आला. कर्मचाऱ्यांनी त्यास दुसरे कपडे देऊन पीपीई कीट काढण्यास सांगितले.
या संदर्भात परळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रात वापरण्यात येणारे उच्च दर्जाचे पिपिई किट रस्त्यावर आढळून येत नाही. या व्यक्तीने घातलेले पीपीई किट शेतीत फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारे असावे. ती व्यक्ती भोळसर असून ओळख पटलेली नाही. दरम्यान, हे पीपीई किट त्या व्यक्तीकडे कुठून आले. शेती कामात असो की कोरोना उपचारानंतर वापरलेले पीपीई कीट घातक असतात. यामुळे असे वापरलेले पीपीई कीट कोणी रस्त्यावर कचऱ्यात तर नाही न टाकले ? मेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे याचा त्वरित शोध घेऊन कारवाई करावी अशी माहिती नागरिकांनी केली आहे.