लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आरोग्यसेवक भरतीसाठी लागणारे फवारणी कर्मचाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्याचे बीड येथील जिल्हा हिवताप कार्यालयात रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे बीड उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनी पुणे येथील आरोग्य सहसंचालक यांच्याकडे केली होती. याप्रकरणी आरोग्य सहसंचालकांनी लातूर येथील उपससंचालकांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, आरोग्य पथकाने बीडच्या कार्यालयाची नुकतीच झाडाझडती घेतली.
याप्रकरणी लटपटे यांनी उपोषणाचा इशारादेखील दिला होता.
याप्रकरणी पुणे येथील आरोग्य संचालक, आरोग्य सहसंचालकांकडे लटपटे यांनी चौकशीची मागणी केली होती. राज्यात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची भरती २००६ सालापासून पूर्णपणे बंद असताना बीड येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन बोगस अनुभव प्रमाणपत्र वाटले आहेत. वास्तविक सदर प्रमाणपत्र देताना त्यांचे बोगस रेकॉर्ड बनवून करोडो रुपये माया कमावली आहे. त्यात काही वरिष्ठ अधिकारी देखील सामील असल्याची तक्रार लटपटे यांनी केली होती. तद्नंतर सहाय्यक संचालकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सदर प्रमाणपत्रांची योग्य सत्यता पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
...
दप्तर ताब्यात
पुणे येथील आरोग्य सहाय्यक संचालकांनी प्रमाणपत्र वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर लातूर येथील आरोग्य उपसंचालकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच बीड येथील जिल्हा हिवताप कार्यालयातील हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद दप्तराची झाडाझडती घेतली. महत्त्वपूर्ण कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतले आहे. या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
.....