लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील चारा छावण्यांची ९ मे रोजी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या वतीने अचानक तपासणी झाली होती. यावेळी काही चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत मोठी तफावत आढळून आली होती. यामध्ये काही छावण्यांवर कारवाई देखील झाली आहे. हे प्रकरण गाजल्यानंतर सोमवारी अचानक विभागीय आयुक्त कार्यालयातील २० अधिकाऱ्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांची तपासणी केली. तपासणी होणार असल्याची माहिती जिल्ह्यातील अधिका-यांना देखील दिली नव्हती.दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात ६०० चारा छावण्या सुरू केल्या आहेत. गत दोन महिन्यांपासून छावण्या कार्यरत असून, जिल्ह्यातील ४ लाख २१ हजारापेक्षा अधिक जनावरे आस-याला आहेत. काही चारा छावण्यात जनावरांची संख्या अधिक दाखवली जात आहे. चारा, पशुखाद्य व शुद्ध पाणी पुरेसे दिले जात नाही, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार ९ मे रोजी कार्यक्षेत्राबाहेरील उपविभागीय अधिका-यांच्या वतीने पडताळणी करण्यासाठी अचानक छावण्यांची तपासणी झाली होती. यावेळी प्रामुख्याने बीड व आष्टी तालुक्यातील छावण्या तपासण्यात आल्या होत्या. यावेळी काही छावण्यांमध्ये ५०० ते १५०० जनावरे कमी आढळून आले होते. याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाई करीत कोल्हारवाडी येथील छावणी रद्द केली होती. त्यानंतर छावण्यांमध्ये गैरप्रकार असल्याचे उघड झाले होते. या कारवाईनंतर भीतीपोटी ७ आणि १० तारखेच्या अहवालामध्ये जनावरांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. बीड जिल्ह्यात साडेसतरा हजार जनावरे प्रत्येक दिवशी जास्त दाखवली जात असल्याचे उघड झाले होते. यात बीड तालुक्यात १६ हजार जनावरे जास्त होती. ही जास्तीची जनावरे दाखवून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावण्याचे काम काही छावणी चालकांकडून केले जात असल्याचे देखील निदर्शनास आले होते.या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर आयुक्त व उपायुक्त यासह इतर २० अधिका-यांच्या पथकाने सोमवारी जिल्ह्यातील छावण्यांची अचानक तपासणी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात देखील छावण्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे ही तपासणी केली असून, याचा अहवाल १४ मे रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिला जाणार आहे. हा अहवाल गुलदस्त्यात असून, विभागीय आयुक्त केंद्रेकर काय कार्यवाही करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.या अधिका-यांनी केली तपासणीअपर विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे, अपर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकूर, प्रकाश खपले, स्वप्नील मोरे, तुकाराम मोटे यांच्या पथकाने आष्टी तालुक्यातील ७ मंडळांमधील चारा छावण्यांची तपासणी केली.उपायुक्त पारस बोथरा, अपर जिल्हाधिकारी औरंगाबाद भानुदास पालवे, ज्ञानोबा बनापुरे, डॉ.डी.एस. कांबळे, साहेबराव दिवेगावकर, डॉ.भिकसिंग राजपूत यांच्या पथकाने बीड तालुक्यातील ६ मंडळांमधील २४ छावण्यांची तपासणी केली.उपायुक्त र.वि. जगताप, अशोक शिरसे, सुनील राऊतमारे, वर्षाराणी भोसले यांच्या पथकाने पाटोदा तालुक्यातील ४ महसुली मंडळांतील १४ चारा छावण्यांची तपासणी केली.प्रतापसिंह कदम, रिता मेत्रेवार, डॉ. भारत कदम यांच्या पथकाने शिरुर कासार तालुक्यातील ३ महसुली मंडळांतील ९ चारा छावण्या तपासल्या.
विभागीय पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:15 AM