अंबाजोगाई ( बीड ): तालुक्यातील खडी केंद्र चालकांनी अवैधरित्या खोदकाम केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे.
परवाना मुदतीनंतर नुतनीकरणाबाबत तहसीलदार संतोष रूईकर यांनी खडी केंद्र चालकांना नोटीस बजावल्यानंतरही परवाने नुतनीकरण केले नाही. त्यामुळे तालुक्यातील खडीकेंद्र सील केले होते. या कारवाईनंतर संबंधित खडी केंद्रांनी किती खोदकाम केले, खडी तयार करण्यासाठी दगड वापरले आहेत काय याची मोजणी करून दंड आकारण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी भूमीअभिलेख कार्यालयास पत्र देऊन खदाणीच्या खोदकामाचे मोजमाप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भूमिअभिलेख व महसूल प्रशासनाने तालुक्यात असलेल्या खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामांची तपासणी केली जात आहे.
तालुक्यातील पोखरी, घाटनांदूर, पिंपळा धायगुडा येथील खडी केंद्रांनी केलेल्या खोदकामाची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी इतर खडी केंदांची तपासणी सुरु आहे. खडी केंद्रानी केलेले खोदकाम नियमानुसार झाले आहे की नाही हे भूमी अभिलेख कार्यालयाच्या तपासणीतून व या विभागाने दिलेल्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. नियमबाह्य खोदकाम झाल्यानंतर या खडी केंद्रांकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याने खडी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.
किती खोदकाम केले हे पाहून दंड वसुलीखडी केंद्राने केलेल्या खोदकामाची तपासणी भूमीलेख अभिलेख व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. किती खोदकाम केले आहे. याचा अहवाल जिल्हाधिकार्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल, असे तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले.