बसस्थानक परिसरात निवारा गरजेचा
वडवणी : शहरातील बसस्थानक हे नगर पंचायतीच्या बचतगट भवनात आहे. तेथून वाहतूक नियंत्रण कक्ष चालवला जातो. या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उघड्यावरच ताटकळावे थांबावे लागते. निवारा, शौचालय, पाणी या सुविधा बस स्थानकात करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
वीज सुरळीत मिळेना; नागरिकांत संताप
वडवणी : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्तास वीज गायब राहत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. याबाबत महावितरणने तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठ सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
‘त्या’ वाहनधारकांवर कारवाईची मागणी
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहन चालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहन चालकांवर कारवाईची मागणी आहे.
हरणांचा उपद्रव
अंबाजोगाई : तालुक्यातील आपेगाव परिसरात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली. मात्र हरणांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे पिकाला फटका बसत आहे. हरीण, काळविटाचा कळप १० ते ५० च्या संख्येने असतो. हे कळप पिके फस्त करीत आहेत.
दुभाजकातील झाडे तहानली
बीड : शहरातील दुभाजकांमध्ये नगर पालिकेने सुशोभिकरणासाठी झाडे लावली आहेत. चांगला पाऊस व नियमित पाणी दिल्यामुळे ती चांगलीच वाढली आणि बहरली आहेत. मात्र दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून झाडांना पाणी देण्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थिंना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. तक्रारीनंतरही लक्ष दिले जात नाही. पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरनाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.