गेवराई : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. येथे मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका आहे.
खंडित वीजपुरवठ्याने मांजरसुंबेकर वैतागले
मांजरसुंबा : बीड तालुक्यातील मांजरसुंबा आणि परिसरात वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके वाळून चालली आहेत. अनेक ठिकाणी तारा खाली आल्या असून, जीर्ण तारांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कार्यालयांना घाणीचा विळखा
पाटोदा : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना घाणीचा विळखा पडला आहे. विविध कामांसाठी येणारे नागरिक तसेच येथील कर्मचाऱ्यांना या घाणीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देत, परिसर स्वच्छ करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
पालांमध्ये राहणाऱ्या गरजूंना साहित्य वाटप
बीड : वै. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने हातोला शिवारात पालामध्ये राहून रोजंदारी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ११ कुटुंबांतील सदस्यांना गहू, तांदूळ, बिस्कीट पुडे आणि फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किसन सानप, रामकृष्ण सारुक यांची उपस्थिती होती. मदत मिळाल्याचे समाधान गरजूंच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
रुग्णालयाभोवती घाण
गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसराभोवती घाण साचली आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून, रुग्ण व नातेवाइकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. परिसरात कचरा टाकू नये, असे वारंवार सांगण्यात येऊनही त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाइकांकडून होत आहे.
तारा लोंबकळल्या
वडवणी : तालुका आणि परिसरातील गावांमध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीज तारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. दुरुस्तीची कामे रखडलेली आहेत. महाविरतण कर्मचारी वेळेवर सापडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
दारू विक्री बंद करा
शिरूर कासार : तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. पोलिसांनी देखील याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पथदिवे बंदच
बीड : शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंदच राहत असल्यामुळे रात्री नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वेळा गरज नसतानाही दिवसाच पथदिवे सुरू असल्याचे निदर्शनास येते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन, विजेचा अपव्यय टाळावा व रात्री पथदिवे सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
हिंगणी-नांदूर रस्त्याची दुरवस्था कायम
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी चिखल होऊन वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.