संजय खाकरे
परळी : तालुक्यातील एकूण १०८ पैकी ७८ गावात कोरोना संसर्गाचाचा शिरकाव झाला असून गुरुवारपर्यंत ३० गावांतील ग्रामस्थांनी कोरोनाला मोठया कष्टाने वेशीवरच रोखले आहे. तर गेल्या महिन्यापासून शहरातही कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. तालुक्यातील नागापूर , दौनापुर ,धर्मापुरी ,कन्हेरवाडी, मांडेखेल, दौंडवाडी, तळेगाव , सोनीहिवरा, बहादूरवाडी देशमुख टाकळीसह जवळपास ७८ गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. परळीतील कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेले तर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण शहरातील खाजगी रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. काहीजण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, खंडोबा मंदिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुक्यातील नागापूर, सिरसाळा ,धर्मापुरी, पोहनेर,मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना चाचणी तसेच लसीकरणही सुरु आहे.
ग्रामीण भागात सुविधा नसल्याने भूर्दंड
शहरात ऑक्सिजनचा तुटवडा, अपुरे बेड असल्याने काही जणांना फटका बसला आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड केअर सेंटरची सोय नसल्याने नागरिकांना उपचारासाठी परळी, आंबाजोगाई येथे जावे लागत आहे.
नियम पाळल्याने गाव कोरोनामुक्त
परळी तालुक्यातील माळहिवरा, गोपाळपुर हे गाव गुरुवारपर्यंत कोरोना मुक्त राहिले आहेत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या आवाहनास सहकार्य केले. कोरोना विषयक नियम पाळले जात आहे त्यामुळे हे गाव आतापर्यंत कोरोना मुक्त राहिले.-भानुदास डिघोळे, सरपंच माळहिवरा, गोपाळपुर.
हॉटस्पाॅट झाले कंट्रोल
ग्रामीण भागात नागापूर हे गाव पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. येथे आतापर्यंत ५० जण बाधित झाले असून त्यापैकी अनेक जण कोरोनामुक्त झाले आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या गावात कोरोनाचे नियम कठोरतेने पाळले जात आहेत. ग्रामस्थांची कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम राबविली आहे. गाव आता नियंत्रणात आले आहे - मोहन सोळंके, सरपंच नागापूर