बीड : जिल्ह्यात सर्वत्र ३१ ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरू होती. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर पंचनामे करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा प्रतिनिधीकडे सुपूर्द केले होते. यामध्ये उत्पन्नात घट झाल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू नये यासाठी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पंचनाम्यावर खडाखोड करून उत्पनातील दाखवलेली घट वाढवल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात घडला असून, त्या विमा प्रतिनिधीचा सेवा समाप्त करण्याण्याची कारवाई करण्यात आली आहे.
कल्याण वाघमारे असे सेवा समाप्त केलेल्या अंबाजोगाई विमा कंपनी प्रतिनिधीचे नाव असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश दिले होते. याद्वारे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, पीक विमा मिळण्यास ते पात्र असल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला होता. त्यानुसार सर्व पंचनामे भारतीय कृषी विमा कंपनीच्या अंबाजोगाई प्रतिनिधीकडे उत्पन्नात घट असल्याचे पंचनामे सुपूर्द केले होते. दरम्यान, पीक विम्याचा लाभ सेतकऱ्यांना मिळू नये या उद्देशाने या विमा प्रतिनिधीने त्यात खडाखोड करून उत्पन्नात वाढ दाखवली होती. ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित विमा प्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली आहे.
विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घट
मागील वर्षी जवळपास १७ लाखांपेक्षा जास्त शेतकरी सभासदांनी पीक विमा उतरवला होता. यापैकी फक्त २० हजारच्या जवळपास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला होता. तसेच विमा कंपनीला २० टक्केप्रमाणे १५९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे २०२१ खरीप हंगामात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत २०२० खरीप हंगामाच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे देखील समोर आले आहे.