बीड : शहरात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मागील काही वर्षांत शहरात नगरपरिषद व सामाजिक संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर, या झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. मध्यंतरी नगरपरिषदेकडून झाडांना पाणी देण्याचे काम सुरू होते, परंतु सर्वच झाडांना पाणी दिले जात नसल्याने अनेक झाडे वाळत आहेत.
बाधितांच्या नातेवाइकांची कसरत
बीड : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नातेवाइकांचीही धावपळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट आणणे, आवश्यक जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नातेवाइकांना तपासणीसाठी नेणे, अशा विविध कामांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ पाहायला मिळत आहे.
शीतपेयांच्या खपावर परिणाम
बीड : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची भीती जनमानसात वाढत चालल्याने त्याचा मोठा परिणाम शीतपेयांच्या खपावर झाला आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी उकाडा वाढला असला, तरी शीतपेये, आइसक्रीम खाणे नागरिक टाळत आहेत. व्यवसायावर परिणाम झाला असल्याने विक्रेते धास्तावले आहेत.