बीड : ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २४ शिक्षकांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. पदस्थापनेचा प्रश्न मागील पाच महिन्यापासून रखडला असून, जागा रिक्त नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परिणामी, या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून उपासमारीची वेळ येत असल्याने, २५ जानेवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा या २४ शिक्षकांनी दिला आहे. ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्हा परिषदेत ४१ शिक्षकांना नियुक्त केले होते, तर ५१ शिक्षकांना बीड जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आले होते. जिल्हा परिषदेत हजर होऊन जवळपास पाच महिने झाले, मात्र अद्याप या शिक्षकांना पदस्थापना मिळालेली नाही. अनेकदा विनंती, अर्ज करूनही जिल्हा परिषदेकडून पदस्थापना मिळालेली नसल्याचे या शिक्षकांनी सांगितले. विहित मुदतीत पदस्थापना न मिळाल्यामुळे विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांनी दोनवेळा पत्रव्यवहार केला, तरीही अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. ग्रामविकास विभागाने २६ ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाही करा असे पत्र काढूनही या पत्रानुसार अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. अद्यापपर्यंत पदस्थापना मिळाली नसल्याने या शिक्षकांची दिवाळी पूर्णतः अंधकारमय झाली. तसेच पगार बंद असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शिक्षकांनी बँक, पतपेढीकडून कर्ज घेतले आहे. त्याचे हप्तेदेखील थकल्याचे सांगण्यात आले. आर्थिक समस्येमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असून, नैराश्याला सामोरे जाण्याची वेळ आल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यापुढे सर्वस्वी जबाबदारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागाची राहील, असा इशारा देत २५ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे.
--------
पुणे जिल्ह्यातून ५, नाशिक जिल्ह्यातून ४, औरंगाबाद जिल्ह्यातून ५, ठाणे जिल्ह्यातून २, सांगली व रायगड जिल्ह्यातून प्रत्येकी १ व अन्य जिल्ह्यातून ६ असे २४ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने बीड जिल्ह्यात आलेले आहेत. मात्र त्यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही.
----
बीड जिल्ह्यात पदे कमी व येणारे जास्त आहेत, त्यामुळे मेळ बसत नाही. आंतरिजल्हा बदलीसंदर्भात राज्याचे ग्रामविकास मंत्री व शिक्षणमंत्र्यांनी २७ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही होईल. तोपर्यंत संबंधित शिक्षकांनी उपोषण करू नये, असे सुचविले आहे.
- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.), जि. प. बीड.