ऑनलाइन किंवा कार्यालयातच करा नोंदणी : सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळालाच भेट द्या किंवा कार्यालयाशी संपर्क करा. कोणत्याही एजंट, मध्यस्थांच्या प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन बीडचे सरकारी कामगार अधिकारी श्री. गुं. मुंढे यांनी केले आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी महामंडळांमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे होते. संकेतस्थळावरही याची माहिती उपलब्ध आहे. नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना शैक्षणिक साहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक साहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना या शीर्षाखाली २५ योजना राबविल्या जातात. शिवाय सुरक्षा संच व अत्यावश्यक संचांचेही वाटप केले जाते. या सर्व योजना मोफत असून, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या योजनांचा नोंदणीकृत कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.
....
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यासाठी ३७ रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते, तर नूतनीकरणासाठी १२ रुपये शुक्ल आकारले जाते. हे शुल्कही ऑनलाईन प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. शुल्क भरल्यानंतर नोंदणी पावती ऑनलाइन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या अनेक मध्यस्थ, दलाल कामगारांची लूट करीत आहेत. तरी कामगारांनी संकेतस्थळावर जाऊन किंवा कार्यालयातच नोंदणी करावी, असे आवाहनही सरकारी कामगार अधिकारी श्री. गुं. मुंढे यांनी केले आहे.