बीड : आळंदी येथील पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान वारकऱ्यांवर लाठीहल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांना पालखी मुक्कामी गावात मूलभूत सुविधांची सोय करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अर्थात शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज पायी दिंडी काढली.
शेकडो वर्षांपासून न्याय, समता, बंधुता, संयम, शांतता आणि सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या वारकऱ्यांवर आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान झालेला लाठीहल्ला अशोभनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला. हा हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना काळिमा फासण्यासारखे आहे. या प्रकरणाला जबाबदार कोण आहे ? पोलिस प्रशासन की तिथली व्यवस्था याची उच्चस्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. ज्ञानोबा-तुकाराम माउलींचा जयघोष करत पालखीसह पायी दिंडी शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दिंडीत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रामनाथ खोड, भगवान मोरे, दामोदर थोरात, बाळकृष्ण थोरात, श्रीहरी निर्मळ, रामचंद्र मुळे, ॲड. गणेश वाणी, महादेव कुदळे, शेख युन्नूस, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, अशोक येडे, रमेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, तुळशीराम पवार, बाबा गायकवाड, संभाजी कोटुळे, संजय पावले, धनंजय सानप, राहुल थिटे, संजय जायभाये, दीपक बांगर, कालिदास वनवे, अशोक सानप, प्रदीप नेवळे,मच्छिंद्र आंधळे यांच्यासह आदी सहभागी होते.