बीड : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील देवस्थान जमीन बनावट दस्तऐवज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांवर आरोप होते, त्यांची चौकशी करण्यासाठी इतरांची नियुक्ती करण्याऐवजी आरोप असणाऱ्यांवरच चौकशीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असे अनोखे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी सोमवारी केले.
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील देवस्थान शेतजमिनीचे बनावट दस्ताऐवज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात जमीन खरेदीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी भू-सुधार प्रकाश आघाव पाटील व आष्टी तहसीलदार राजाभाऊ कदम, मंडळ आधिकारी, तलाठी यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली होती. मात्र, उपजिल्हाधिकारी भू-सुधार प्रकाश आघाव पाटील यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश आघाव यांच्याकडे देण्यात आले होते, तर दुसऱ्या प्रकरणात बीड तहसीलदारांवर आरोप असताना त्यांनाच चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचा आरोप करण्यात आला. याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली, शेख युनूस. शेख अन्नेश, आसिफ शेख, सलिम शेख, फिरोज शेख, शाहपरी शेख, हवाबी शेख, अहमदाबी शेख, हिना शेख, सुहाना शेख आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.