मुषकाचा कान पकडणार तोच त्याने टुणकन् उडी मारली अन्
'महाराज सवारी तैयार हैं... बस हुकूम फर्माइए...' म्हणत रथाकडे वळाला.
बाप्पांनी तोंडाला मास्क लावला अन् सवारी निघाली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे.
मुख्य रस्ता, चौक येथे कोठेही सिग्नल सुरू नव्हते. वाहतूक पोलीस तेवढे धुळीत उभे होते. काय रे हे सिग्नल बंद कसे? मूषक पुन्हा हसला... महाराज, अहो, सिग्नलचं काय घेऊन बसलात पथदिवे सुद्ध रात्री बंदच असतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तीच अवस्था. पार्किंगमध्ये रथ उभा करून मूषक व बाप्पा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाऊल ठेवतात.
मूषक म्हणतो, राजासाहेबांना भेटण्यापूर्वी आधी कार्यालय दाखवितो. महाराजांनी मूषकाला खुणावले. म्हणाले, ही मोठी पाटी कोणाची महाराज, अहो हे अर्ध्या जिल्ह्याचे सुभेदार. आडनावात वार अन् कामाचा खूप भार... हल्ली औरंगाबादचा अतिरिक्त चार्ज असतो त्यांच्याकडे. मूषक चार पावले पुढे नेतो अन् म्हणतो ही वाघाची गुहा... बाप्पा दचकलेच.. तसा मूषक कानाजवळ जातो अन् म्हणतो, तसं नाही हो ही आहे गुन्हे शाखा... पकडला आरोपी की ठोका... अधूनमधून साधतात 'मोका'... कधी-कधी एमपीडीए अन् कधी तरी हद्दपारी... तरीही राेखत नाही गुन्हेगारी...बाप्पा मुषकाकडे पाहतच राहिले. बाप्पांनी थेट मुद्द्याला हात घातला म्हणाले, अरे बीडचा क्राइम रेट जास्त... मग कायदा- सुव्यवस्थेचे काय? शेपटी हलवित मूषक म्हणतो, 'रेट' जास्त आहे खरे आहे... कायद्याचे नाही अनेकांना फायद्याचे पडलेले. अदखलपात्र प्रकरणातही नेते दखल देतात...केवळ पोलिसांचा दाेष नाही...बाप्पा म्हणाले, अरे त्या परळीतील पिस्तूल प्रकरणाचं काय झालं. डिक्की कोणी उघडली होती.. मूषक हसतो अन् म्हणतो, पुलीस पुरी कोशिश कर रही हैं... डिक्की खोलने वाले की जांच अभी जारी हैं..! बाप्पाही गालातल्या गालात हसले.