अंबाजोगाई : अवघ्या १५ हजार रुपयात आयफोन देण्याच्या बहाण्याने येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.
शहरातील आनंदनगरातील राहणाऱ्या सागर अशोक मोहिते या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने ई-बे या वेबसाईटवर आयफोन ६ एस अवघ्या १५ हजारात विक्रीस असल्याची जाहिरात पाहिली. त्याने वेबसाईटवरून विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक घेऊन थेट संपर्क केला. विक्रेत्याने सदरील वेबसाईटवर असलेली ही आॅफर बंद झाल्याचे सांगितले. तरीदेखील फोन पाहिजे असेल तर हायटेक सोल्युशन्स प्रा.लि. च्या पेटीएम वॉलेटमध्ये १५ हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार २२ मे रोजी सागरने १५ हजार रुपये सदरील कंपनीकडे जमा केले आणि त्यांना फोन लावला.
त्यांनतर दोन दिवसांत मोबाईल घरपोच मिळेल, असे सांगण्यात आले. २३ मे रोजी सागरला पुन्हा फोन आला आणि आणखी ३ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. सागरने नकार देताच त्यांनी ३ हजार जमा केले नाहीत तर आधीचे १५ हजार देखील परत मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने सागरने आणखी ३ हजार रुपये हायटेक सोल्युशन्सकडे जमा केले. त्यानंतर आणखी अठराशे रुपये पाठव, अशी सूचना सागरला केली.
त्यामुळे फसवणुकीची शक्यता वाटल्याने सागरने त्यांच्याकडे फोटो आयडीची मागणी केली असता विक्रेत्याकडून त्याला पंकज राजकुमार शर्मा (रा. नवी दिल्ली) या नावाचे आधार कार्ड दाखविण्यात आले. पैसे आणि मोबाईल मिळण्याची खात्री न वाटल्याने अखेर सागरने पेटीएमकडे याबाबत तक्रार केली. यावर पेटीएमकडून त्यास पोलिसात जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर सागरने अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पंकज राजकुमार शर्मा याच्यावर कलम ४१५, ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.