बीड : गांजा, सिगारेट, दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून एका आरोपीने मैदानात खेळणाऱ्या मुलांना मारहाण करून आयफोन मोबाईल चोरला. परंतू बीड शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत याचा छडा लावून चोरट्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई बीड शहरातील बार्शी नाका परिसरात सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
शेख फिरोज शेख सादेख (वय २८ रा.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी ज्ञानदीप बालासाहेब तोंडे (वय १५) हा मित्रांसोबत खासबाग परिसरात खेळत होता. याचवेळी फिरोज तेथे आला. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून तो ज्ञानदीप जवळ गेला. मी पोलीस असून तुझा मोबाईल माझ्याकडे दे. उद्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून घेऊन जा, असे सांगून मोबाईल हिसकावला. परंतू ज्ञानदीपने त्याचा पाठलाग केला. यावेळी फिरोजने त्याला मारहाण केली. तसेच मागे येत असल्याने दगड फेकून मारले. त्यानंतर काही क्षणात तो दिसेनासा झाला.
दरम्यान, ज्ञानदीपने पालकांसह शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. डीबी पथकाने या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपले खबरी कामाला लावले. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास फिरोज हा बार्शी नाका परिसरात गांजाची नशा करत असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी लगेच सापळा लावून त्याला अटक केली. ही कारवाई रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे बाळासाहेब सिरसाट, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुसेन पवार, अविनाश सानप आदींची आदींनी केली.