अनिल महाजन
धारूर : धारूर तालुक्याची डोंगराळ तालुका व ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणून ओळख. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत झालेल्या विविध साठवण तलावांमुळे लाखो लिटर पाणी अडवण्यात यश आल्याने हा तालुका आता हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असून, हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे. काही ऊसतोड कामगारांच्या हातचा कोयता यामुळे सुटणार आहे.
धारूर तालुका हा डोंगराळ दुष्काळी तालुका. या तालुक्यात खरिपाचे एक पीक पावसाच्या भरवशावर घ्यायचे. पुढे सहा महिने राज्यात, शेजारील राज्यात ऊस तोडायला जायचे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका, अशी ओळख या तालुक्याची सर्वत्र होती. मात्र, या तालुक्यात पावसाचे पडणारे पाणी डोंगर भागात कुठेही अडवल्या न गेल्याने हे सरळ नदीपात्रात वाहून जात होते. मात्र, १९९५ च्या युती शासनाच्या काळात या तालुक्यात चारदरी, घागरवाडा, धारूर साठवण तलाव झाले व मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणीच अडवले गेले. त्यानंतरच्या काळात बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेले खोडस व मोरफळी साठवण तलाव हेही पूर्ण झाल्याने या ठिकाणीही पाणी अडवले गेले व या भागात शेती सिंचनाखाली येण्यास मोठी मदत झाली.
आंबेवडगाव येथे असणारा कुंडलिका साठवण तलाव हा तर आसपासच्या दहा गावांना मोठा आधार ठरला, तर मोहखेड येथील सरस्वती मध्यम प्रकल्प रेपेवाडी येथील साठवण तलाव या भागात मोठा आधार ठरला. अरणवाडी साठवण तलावामुळे डोंगरातील गावांत बदल होणार आहे. हे मोठे साठवण तलाव व आता होणारा पिंपरवाडा साठवण तलाव, त्याचप्रमाणे डोंगरदऱ्यांत झालेले छोटे-मोठे पाझर तलाव यामुळे मोठ्या प्रमाणात या तालुक्यातले पाणी या तालुक्यात अडवले गेले.
डोंगरपट्ट्यात हरितक्रांती झाल्याचे आज दिसून येत आहे व यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही संख्या वाढली. भाजीपाला उत्पादक शेतकरीही वाढले. त्याचप्रमाणे नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कलही वाढल्याचे दिसून येते.
या तालुक्यात सिंचनाचे प्रकल्प वाढल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन झाला व या भागातील अनेक ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयते जाऊन त्यांचीही शेती ओलिताखाली आली. तालुका हा हरितक्रांतीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात यापेक्षा मोठे बदल तालुक्यात झालेले दिसून येणार आहेत.
140821\14bed_6_14082021_14.jpg