माजलगाव नगरपालिकेत साडेसहा कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात तीन मुख्याधिकारी व चार लेखापालांविरूध्द गुन्हे दाखल झाल्यानंतर २०२० उजाडताना या भ्रष्टाचारात पुढे किती जणांची नावे येतात, याबाबत शहरवासियांना उत्सुकता लागली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना नगरपालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य आरोपी म्हणुन गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षांना पदावरून बरखास्त करण्यात आले. वर्षभर नगराध्यक्ष पदाचा मुद्दा गाजला. ऑक्टोबरमध्ये नुतन नगराध्यक्षपदी शेख मंजुर यांची निवड झाली.
फेब्रुवारीत मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत मराठवाडा मतदार संघातून माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक हे मोठ्या फरकाने निवडुन आहे. परंतु कोरोनामुळे सभापती पदाची निवडणूक लांबली. ३० ऑगस्ट रोजी मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी अशोक डकांच्या रूपाने प्रथमच जिल्ह्याला मान मिळाला.
मार्चनंतर कोरोनाच्या भितीने लोकांमध्ये दहशत निर्माण झाली. लग्नसमारंभ छोटेखानी होऊ लागले.या काळात काही लोकांना रोजगार मिळणे कठिण झाले. सरते संपूर्ण वर्ष भितीमध्ये जात असलेतरी येणारे वर्ष चांगले जाईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.