धारूर शहरातील आंबेडकर चौक ते कोर्ट हा महत्त्वाचा रोड आहे. याच रस्त्यावर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वन विभाग, न्यायालय, आयटीआय व इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. तसेच ऐतिहासिक किल्ला व अंबाचोंडी मंदिराकडे जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग होतो, परंतु मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने नवीन रस्ता करण्याची मागणी होत होती. धारुर नगर परिषदेच्या वतीने रस्ते अनुदान निधीतून ४०० मीटर तहसील कार्यालय ते डोंगरवेसपर्यंत रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. यातील ११० फुटांवर काँक्रिट तर राहिलेल्या भागात डांबरीकरण होणार आहे. या रस्त्यावर पूर्वीच्या नालीचे घाण पाणी जाण्यासाठी तीन पूल आहेत, मात्र यातील दोन पूल बुजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नालीचे घाण पाणी तुंबलेले आहे. यामुळे ते रस्त्यावर येते. होत असलेल्या रस्त्यावर लेव्हल न करता करत असल्याने आणखीन पाणी जाण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या कामाच्या आधी पुलाचे काम करण्याची मागणी केली जात आहे.
तहसील ते डोंगरवेस रस्ता काम करण्यापूर्वी पूल करणे अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:37 AM