लोकमत न्यूूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. ही विकास कामे सर्व विभाग प्रमुखांनी तत्काळ पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी अडचणी येतील, त्या अडचणी सोडविण्यासाठी मी खंबीर आहे. ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी जर चुकीची कामे सांगत असतील तर ते अधिकाऱ्यांनी ते मान्य करू नये. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
१४ जून रोजी आष्टी तहसील कार्यालयात आमदार आजबे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती,
आष्टी तालुक्यामध्ये तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी पाच कोटी रुपये मंजूर आहेत. परंतु जागेच्या किरकोळ अडचणीमुळे हा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन हा प्रश्न आपण येत्या काही दिवसात मार्गी लावणार आहोत. याविषयी जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अनेक योजना राबवताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुका प्रशासनाने अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आष्टी, पाटोदा तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय वसतिगृह व ऊसतोड कामगारांच्या मुलांचे वसतिगृह मंजूर आहे. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे, असेही आजबे यांनी सांगितले.
....
जनावरांचे लसीकरण करा
आष्टी तालुक्यात घटसर्प, लाळ्या खुरकुत आदी आजारांनी अनेक जनावरे दगावली आहेत. याकडे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. तालुक्यातील ज्या भागांमध्ये जास्त फैलाव आहे. अशा भागात जनावरांना तत्काळ प्रतिबंधक लस देऊन उपचार करावेत. इतर ठिकाणीही तालुक्यामध्ये सर्व जनावरांना लस देऊन पशुपालकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी, असे आवाहनही आजबे यांनी केले.