लोकमत न्यूज नेटवर्क
कारखेड़ा माजलगाव : शहरात लॉकडाऊन लागू असताना गल्लीबोळातील दुकाने मात्र उघडी ठेवली जात असून, आईसक्रीम विक्रेते उघडपणे व्यवसाय करत आहेत. तर शहरातील नागरिकही खुलेआम फिरत असताना पोलीस किंवा नेमलेल्या पथकाकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. यामुळे नागरिकच नियमांचे पालन करत नसतील तर या लॉकडाऊनचा काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे तसेच नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन केला. संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना माजलगाव शहरात नागरिक बिनधास्त फिरत आहेत. शहरातील गल्लीबोळातील दुकाने खुलेआम सुरू असतात. शहरात रात्रीच्या वेळी जागोजागी गाडे लावून आईस्क्रीम विक्रेते आपला व्यवसाय करताना दिसत आहेत तर नागरिकही खरेदी निमित्ताने घराबाहेर पडत आहेत.
बाहेरगावाहून येणाऱ्या तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना कोणीही हटकताना दिसत नसून, ते बिनदिक्कत शहरात येत आहेत. याकडे पोलिसांचे व नगरपालिकेने नेमलेल्या पथकाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी मुले घोळका करून थांबलेली पाहायला मिळतात. यामुळे एकमेकांचा संपर्क कमी होण्याऐवजी वाढताना दिसून येत आहे. यामुळे माजलगाव शहरात लॉकडाऊन आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस व पथके नावालाच
माजलगाव शहरात गल्लीबोळातील दुकाने खुलेआम सुरू असताना व नागरिक दिवस - रात्र बिनधास्त फिरत असताना एकाही चौकात पोलीस किंवा नगरपालिकेने नेमलेल्या पथकातील कर्मचारी दिसून येत नाहीत. यामुळे माजलगाव शहरात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती आहे. तर मोंढ्यात गर्दी होत असताना एकही पोलीस फिरकत नाही. हॉटेलवाल्यांना केवळ पार्सल देण्याची मुभा दिलेली असताना येथे अनेक हॉटेल, पुरीभाजी सेंटर, चहाची हॉटेल येथे नागरिक बिनधास्त येवून बसून जेवण करत होते. त्यामुळे नेमलेली पथके आपले काम करत आहेत की नाहीत, याबाबत येथील तहसीलदार अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली
शहरात विविध व्यवसाय करणारे व्यापारी आपली दुकाने उघडून जेव्हा ग्राहक करतात, तेव्हा निम्म्यापेक्षा जास्त व्यापारी, हातगाडीवाले, फळविक्रेते, हॉटेल चालक व तेथे काम करणारे कामगार विनामास्क वावरत असतानाही नगरपालिकेने नेमलेले पथक यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही.
शहरात नागरिक फिरत असतील व मास्क न वापरता व्यापारी दुकाने उघडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस व नेमलेल्या पथकाला सांगण्यात येईल.
- वैशाली पाटील, तहसीलदार
===Photopath===
310321\purusttam karva_img-20210331-wa0004_14.jpg~310321\purusttam karva_img-20210331-wa0002_14.jpg