लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची माेठी गर्दी होत आहे. असे असले तरी काही महिलांच्या मनात मासिक पाळीबाबत संशय आहे. मासिक पाळीत लस घ्यावी की नाही, हा प्रश्न त्यांच्या मनात होता. परंतु ‘लोकमत’ने स्त्रीरोग तज्ज्ञ आणि नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी मासिक पाळीत लस घेण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे महिलांनी मनात कसलाही गैरसमज न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी गर्भवती व बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये, असेही सांगण्यात आले. असे केल्यावर त्रासदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. संजय कदम म्हणाले.
काय म्हणतात, नोडल ऑफिसर अन् स्त्रीरोग तज्ज्ञ
मासिक पाळीत लस घेण्यास काहीच हरकत नाही. जर महिलांना इतर काही त्रास नसेल तर त्या लस घेऊ शकतात. लस घेतल्याने काहीही गुंतागुंत हाेत नाही. याबाबत लातूर व इतर ठिकाणच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनीही याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे महिलांनी न घाबरता कोरोना लस घ्यावी, असे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री शिंदे यांनी सांगितले; तर लसीकरणाचे नोडल ऑफिसर संजय कदम म्हणाले, मासिक पाळीत लस घेण्याबाबत विशेष अशा काही मार्गदर्शक सूचना नाहीत. परंतु लस घेतल्याने महिला अधिक सुरक्षित राहू शकतात.
यांनी लस घेऊ नये - कदम
मासिक पाळी असलेल्यांना लस घेण्यास काहीच हरकत नाही; परंतु गर्भवती व बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये, असे मत नोडल ऑफिसर डॉ. संजय कदम यांनी व्यक्त केले. महिलांनी मनातील सर्व गैरसमज दूर करून लस घेण्यासाठी पुढे यावे. ज्या महिलांना लसीबद्दल शंका आहे, त्यांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
---
अशी आहे आकडेवारी
आतापर्यंत एकूण लसीकरण - २३४०४७
पहिला डोस - १९०८०७
दुसरा डोस - ४३२४०