बीड : बीड जिल्ह्यातील परळी येथे करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूल प्रकरणात पोलिसांना तपासासाठी आणखी एक दिशा मिळाली असून, चालत्या गाडीची डिक्की उघडणे शक्य असल्याचा अहवाल आरटीओ आणि मोटार वाहन परिवहन विभागाने दिला आहे.यासंदर्भात पोलीस प्रशासनाने अहवाल मागविला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली आहे.
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या वाहनाची डिक्की उघडून काहीतरी ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून गाडीच्या डिक्कीत कोणीतरी पिस्तूल ठेवल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनास देखील तपास करत होते. मात्र, गाडी सुरू असताना बाहेरून चारचाकीची डिक्की उघडणे अशक्य असल्याचे मतदेखील व्यक्त केले जात होते. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा बनला होता, त्यावर बीड पोलिसांनी आरटीओ आणि पोलिसांच्या एमटी (मोटार वाहन परिवहन) विभागाकडून अहवाल मागविला होता. त्यात अशा प्रकारे डिक्की उघडता येणे शक्य असल्याचा अहवाल या दोन्ही विभागांनी दिला असल्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाला आणखी एक दिशा मिळाली आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारा तो व्यक्ती फरार असल्याने त्याचा शोध सुरू असल्याचे देखील अधीक्षक आर. राजा यांनी या वेळी सांगितले.