लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे आणि पाझर तलाव फुटल्याने पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित व जिल्हा परिषदेचे सभापती युधाजित पंडित यांनी भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी ‘आमचे होत्याचे नव्हते झाले, आता तुम्हीच आम्हाला मदत मिळवून द्या’, अशी विनवणी शेतकऱ्यांनी केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. ज्या तलावाच्या पाण्यावर पुढचे आठ महिने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, तो तलाव तासाभरात शंभर टक्के भरून फुटला. त्याच्या वेगवान पाण्याने शेतातील उभे पीकच काय, तर शेत जमिनीही खरडून वाहून गेल्या. अनेकांची घरे पडली, धान्य भिजले, संसार उघड्यावर पडले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
शुक्रवारी आणि शनिवारी बदामराव पंडित व युधाजित पंडित यांनी रेवकी-देवकी, धोंडराई सर्कल, खेर्डा, नंदपूर, मारफळा, भेंड खुर्द, उमापूर, मारुतीची वाडी, खळेगाव येथील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भेटी घेतल्या. धीर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निश्चितपणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत लवकरच मिळेल, असा विश्वास बदामराव पंडित यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख कालिदास नवले, सरपंच भय्यासाहेब नाईकवाडे, सरपंच शेख फत्ते, सरपंच धनेश्वर खेत्रे, विलास शिंदे, आबा उबाळे, गणेश शिंदे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.