अनिल भंडारी
बीड : ‘शेतात पिकंना, पिकलं तर पाऊस खाऊ देईना. पसाभर रानात आलं नाही तर लेकरांनी काय खायचं? लई वाटोळं झालं. असं वाटतं मरु तर बरं पण मरायची नाय’ अशी कैफियत मांडताना उखंडा पिठ्ठी भागातील पार्वती कदम धाय मोकलून रडत होत्या.. आणि ते पाहून आम्हीही स्तब्ध झालो. ‘उन पडायलंय वाळंन सगळं’ असा धीर देत होतो. तोच कर फुटलेली बाजरीची कणसं दाखवत ‘काय वाळंन, सगळंच उगून आलंय बघा’ असे सांगताना पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते.
मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या बाजरीची कणसं रस्त्यावरच कडेला वाळू घालत पार्वती आणि पती मारुती कदम हे चिंतातुर जोडपे दिसले. हातात पीक विम्याची कागदं होती. पार्वतीला तीन मुले. या कुटुंबाला अवघी ४- ५ एकर जमीन. पावसामुळे झालेल्या नुकसानीची खबर भेटल्याने पुण्याला असणारा एक मुलगा आश्रुबा येऊन गेला होता. दुसरा मुलगा सोमनाथ वाहन चालक होता. ब्लड कॅन्सर झाल्याने १९९९ मध्ये वारला तर तिसरा परमेश्वर हा वाशी (जि. उस्मानाबाद) येथे हमालीचे काम करत होता. २००४ मध्ये भिंत पडून मृत्यू झाल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही पीक नुकसानीच्या पंचनाम्याला आलोत, असे वाटल्याने निसर्गाने मांडलेला खेळ त्या कथन करीत होत्या.निसर्गाने पिकांवर वरवंटा फिरविला तरी जगण्याची उर्मी त्यांच्या मनात मात्र जाणवत होती.
धरणीला ओझं झालं पण बुचाड शाबूत राहिलं नाहीउखंडा पिठ्ठीत पोहचल्यावर एका झोपडीवजा हॉटेलवर तुकाराम भोंडवे, लक्ष्मण ठोसर भेटले. शंभर ते सव्वाशे शेतकरी असलेल्या साधरणत: दीड हजार लोकसंख्येचं हे गाव. तुकाराम बोलत होते, धरणीला ओझं झालं? काय त्याचं करावं. शेतात एखादं तरी बुचाड शाबूत राहिलं का? कर आले. पसरी वापल्या, खोबड्या वापल्या. सोयाबीन भिजून कर फुटलं तसंच वावरात राहिलं. वावरात पाणीच पाणी. पाणी कुठून आलं, कुठं गेलं याचा मेळच लागला नाही. यंदा पाऊस बरा झाला होता. पिकेही चांगली होती पण..पुढे त्यांना शब्दच सुचत नव्हते.
६० वर्षात असा ‘बदमाशा’ पाऊस नव्हतानांगरणी, पाळी, मोगडा असा ४-५ हजार रुपये तर तीन पिशवयाला १० हजार खर्च केले. पिकही जोमात आलं, पण पावसाने शेत चेंवदाड झालं. वाळनं पण शेतात पडलेलं घ्यायला कुणी येईना. कवा पाणी आटन, कधी कापूस वेचावा, कधी कटकट मिटंल. आधीही पाऊस होता. पण एवढं नुकसान केलं नव्हतं. ६० वर्षात असा बदमाशा पाऊस नव्हता बघा. सरकारचं आपलं तर जमतच नाही, असं म्हणाताना सरकारी मदतीबद्दल लक्ष्मणरावांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.