शिरूर कासार : गुरुवारी दिवसभर कडाक्याचे ऊन पडल्यानंतर, सायंकाळी आभाळ काळेभोर झाकोळून आले. विजाही चमकू लागल्या, तर याचबरोबर ढगांचा कडकडाट सुरू होऊन पावसाची चाहूल लागल्याचे दिसून आले. पावसाळीपूर्व शेतीकामांनी वेग घेतला आहे.
वानराच्या टोळीचा मुक्त संचार
शिरूर कासार : तालुक्यात बुधवारपासून वानराच्या टोळीचा मुक्त संचार रानावनात दिसून येत आहे. त्याचे उत्सुकतेपोटी हौसी व मायाळू लेकरं वानरांना कांदा, भाकरी व पाणीही देत असल्याचे चित्र दिसत असले, तरी काहीसा उपद्रवही या बिचाऱ्या वानरांना सहन करावा लागत होता. अशा वेळी ते पटकन उडी मारून आपली जागा बदलत होते.
आजोळ परिवाराचे निर्जंतुकीकरण
शिरूर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन येथे निराधार निराश्रितांसाठी हक्काचे समजले जाणारे आजोळ परिवार स्थळी निर्जंतुकीकरण करण्यात आले. येथे आश्रयाला असलेल्या वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी म्हणून स्वत: कर्ण तांबे यांनी पाठीवर फवारा घेऊन, परिसर व निवासाच्या खोल्यांचे फवारून निर्जंतुकीकरण केले.
डासांचा उपद्रव वाढला
शिरूर कासार : मध्यंतरी डासांचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, आठ-दहा दिवसांपासून डासांच्या थव्यांनी पुन्हा सक्रिय होऊन उपद्रव सुरू केला असल्याने, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी धूर फवारणीची गरज असल्याचे बोलले जात आहे, नगरपंचायतने दखल घेऊन धूर फवारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोना रुग्णांत घट, थोडासा दिलासा
शिरूर कासार : तालुक्यात गेली तीन-चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. तालुक्यात दोनशेचा आकडा पार केला होता. आता मात्र तो पन्नाशीच्या आत आला आहे. नागरिकांनी सतर्क राहिल्यास, तो शून्यावर येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.