बीड - भाजपा नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनीराष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे. गतवर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे मोठ-मोठे वाढदिवस साजरे झाले. आजही मेळावे घेतले जात आहेत, यासंदर्भात आपण पोलीस अधीक्षकांना विचारणार असल्याचे पंकजा यांनी म्हटले. तसेच, नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीकाही केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर परळीत लावलेत, जंगी तयारी सुरू आहे, असा प्रश्न पंकजा यांना विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना पंकजा यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना अहंकार झाल्याचं म्हटलंय.
मी आता एसपींना विचारणार आहे की, तुम्ही काय करणार? आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. मात्र, याच जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम झाले, दिवाळीच्या फराळाचे कार्यक्रम झाले. आता, मेळावे घेतायंत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भव्यतेनं वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठमोठे केक कापण्यात आले. कोरोना अद्यापही पूर्णपणे गेला नाही. लोकांना आर्थिक अडचणी आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायलं हवं, हे काय, असे म्हणत पंकजा मुंडेंनीधनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. सत्ता असो किंवा नसो दुरुपयोग करणं हेच त्यांना कळतं. अहंकार नक्की होतोय, असे पंकजा यांनी म्हटलं.
करुण शर्मा प्रकरणावरुनही साधला होता निशाणा
मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा परळीत आल्या होत्या. त्यावेळीही, पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. परळी शहरात झालेल्या सर्व प्रकारामुळे राज्याची मान खाली गेल्याची प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली होती. याबाबत त्यांनी ट्विट केलं, 'अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong president should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची !!', अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी करुणा शर्मा प्रकरणावर भाष्य केलं.