लोकमत न्यूज नेटवर्क
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ओढे, नाले, नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत शेतातील सर्व पिके पाण्याखाली आहेत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिकडेतिकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील परिसरात सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे सर्वत्र दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. होणाऱ्या नुकसानीचे अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याची चर्चा परिसरात होत आहे. शेतकऱ्यांना शेतातील पिके पाण्याखाली गेल्यामुळे या नुकसानीचा विचार करूनच धडकी भरणारे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. शेतमजूर व साधी घरे असणारे सामान्य लोक उदरनिर्वाहाच्या काळजीने चिंताग्रस्त झाले आहेत.
....
प्रशासन सज्ज
माजलगाव तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांच्या बैठका घेऊन आपापल्या विभागातील कार्यानुसार आपत्ती व्यवस्थापन करण्यासंदर्भात सर्व सूचना प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या कालावधीमध्ये प्रशासन आणि सर्व जनता यांच्यामध्ये समन्वय साधून, नागरिक व प्रशासनाच्या एकजुटीने होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, असे माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले.
...
070921\save_20210907_141837_14.jpg~070921\save_20210907_135813_14.jpg
माजलगाव तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, छोटेवाडी परिसरातील सोयाबीन, कपाशी पिके पाण्याखाली गेले आहेत. तर दुस-या छायाचित्रात मोठेवाडीत घरात पाणी शिरलेले पाणी.~