परळी : येथील नवीन परळी औष्णिक केंद्राच्या वीज निर्मितीसाठी पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून ११ आॅगस्ट रोजी सोडलेले पाणी विद्युत केंद्राच्या खडका (ता.सोनपेठ) बंधा-यात सोमवारपासून पोहचणे सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विद्युत निर्मिती होऊ शकते असा कयास लावला जात आहे.बुधवारी खडक्यातील पाणी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या रो वॉटर टॅँकमध्ये येईल. त्या अनुषंगाने विद्युत केंद्र प्रशासनाने तयारी सुरू केली .तसेच दाऊतपुर येथील नवीन परळी विद्युत केंद्रातील तीन संच चालू करण्याची प्रक्रि या चालू करण्यात आली. बंद असलेले संच चालू करण्यासाठी विविध चाचण्यास प्रारंभ केला आहे . तीन दिवसात संच चालू होऊन विद्युत निर्मिती होईल . गेल्या सात महिन्यांपासून २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच बंद ठेवण्यात आले आहेत. एमओडी रेटमध्ये बसत नसल्याने हे संच बंद ठेवण्याचा निर्णय महाजनकोने घेतला होता. आता पाणी मिळणार असल्याने तीन संचापैकी किती संच सुरू करावेत याचा आदेश येथे अद्याप प्राप्त झाला नसल्याचे समजते.आठवडाभरात खडका बंधारा पाण्याने भरेल, या बंधा-याची पाणी साठवण क्षमता ५.०२ एम. एम. क्यूब इतकी आहे. व यातील पूर्ण पाणी वीज निर्मितीसाठी दोन महिने पुरेल. तसेच खडका बंधाºयालगतच्या गावातील विहिरी तसेच शेतीला फायदा होईल, असे मानले जात आहे.
सोनपेठच्या खडका बंधाऱ्यात आले जायकवाडीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:43 PM