अंबाजोगाई (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी अंबाजोगाईतील तरूणांनी आज जेलभरो आंदोलन केले. सरकारविरोधी घोषणा देत शेकडो तरूणांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी पोलिसांनी २५ आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे अश्या घोषणा देत आज सकाळी ११ वाजता शेकडो तरुण अंबाजोगाई बसस्थानकासमोर जमा झाले. जमलेल्या तरुणांनी तासभर बस स्थानकासमोरच ठिय्या दिला. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी ॲड. माधव जाधव, प्रशांत आदनाक, प्रशांत सुभाषराव शिंदे, नेताजी साळुंके, योगेश कडबाने, दिग्विजय भास्करराव लोमटे, प्रशांत गोपीनाथ शिंदे, गणेश मोरे, प्रविण गंगणे, राणाप्रताप चव्हाण, महेश कदम, अमोल लोमटे, अजय पवार, भीमसेन लोमटे, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पतंगे, राहुल लोमटे, सुधाकर कचरे, निलेश जाधव, मेघराज जोगदंड, लकी जगदाळे, प्रविण मोरे, गोविंद पोतंगले, विजयकुमार गंगणे या २५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ६८, ६९ अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सोडून देण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलनस्थळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.