जळगाव/बीड : बीड येथील दिलीप प्रकाश केंद्रे (३४) या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात जळगावातील पारो (नाव बदलले) या तरुणीला बुधवारी बीड पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिलीप केंद्रे या पोलिसाने मंगळवार स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पारो हिच्या नावाचा उल्लेख आहे. तिनेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार केंद्रे यांच्या पत्नीने दिल्याने तिच्यासह उमेश पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी बीडचे पोलीस हवालदार कैलास ठोके, तुकाराम तांबोरे, विजय घोडके महिला पोलीस सौदरमल विद्या वैधाली यांचे पथक शहरात दाखल झाले.
रामानंद पोलीस ठाण्याचे रवींद्र पाटील, संतोष गीते, उज्ज्वला पाटील यांना सोबत घेत पथक पिप्राळा हुडको येथे गेले. पथकाने तेथून पारो हिला ताब्यात घेत रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद केली. त्यानंतर हे पथक बीडकडे रवाना झाले. याप्रकरणातील दुसरा आरोपी उमेश पाटील हा पोलीस शिपाई असल्यामुळे त्याची चौकशी होऊन त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. केंद्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची तपासणी पोलीस करीत आहेत.
केंद्रे पूर्वी रामानंदनगरला ड्यूटीलाकेंद्रे हे सन २०१० मध्ये जळगाव पोलीस दलात भरती झाले होते. रामानंदनगर पोलीस स्टेशनलाच त्यांची ड्यूटी होती. पिंप्राळा हा भाग रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने ते पारोच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांची बदली बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली. यावेळी ते त्यांची पत्नी व ४ वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरातील स्वराज्यनगर भागात राहत होते. दरम्यान पारो व तिचा प्रियकर उमेश पाटील हे दोघे केंद्रे यांना बदनामी करेल अशी धमकी देत होते. तसे त्यांचा मानसिक छळ करत होते, पारो ही दिलीप यांना सतत कॉल करून आपले आळंदी येथे लग्न झाले आहे. त्यामुळे पत्नीशी फारकत घेऊन जळगावला ये, अन्यथा आपले सोबतचे फोटो, व्हीडिओ व्हायरल करेल. अशी धमकी देत असल्याने केंद्रे हे तणावात राहत होते.