बीड : तीन वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील एका जोडप्याने धुम ठोकली होती. याचा तपास बीड पोलिसांनी पूर्ण करून त्यांना पुण्यातील वाघोली परिसरातून ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी १२ वाजता ही कारवाई बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केली.
संतोष वसंत वाघमारे (२१ रा.आवलगाव ता.घनसावंगी जि.जालना) हा आजीकडे शिक्षणासाठी आला होता. याचवेळी त्याची समोर राहणाऱ्या गंगा (नाव बदलले) सोबत ओळख झाली. रोज येणे-जाणे, बोलण्यातून त्यांची चांगलीच मैत्री झाली. मैत्रितून प्रेम जुळले. २०१६ साली त्यांनी गावातून धुम ठोकली. गंगाच्या पित्याने सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळाली नाही. अखेर घनसावंगी पोलीस ठाणे गाठून संतोष विरोधात संशय व्यक्त करून गुन्हा नोंद केला.
घनसावंगी पोलिसांनी वर्षभर तपास केला, मात्र त्यांना हे जोडपे सापडले नाही. जून २०१८ ला याचा तपास बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाकडे आला. पथकाने विविध ठिकाणी जावून सापळा लावला, मात्र ते यात अडकले नाहीत. अखेर मंगळवारी हे जोडपे वाघोली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तात्काळ पथक वाघोलीला पोहचले आणि दुपारी १२ वाजता या जोडप्याला लोणीकंद पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. जोडप्याला घनसावंगी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी भारती, प्रताप वाळके, सिंधु उगले, निलावती खटाणे, सतीष बहिरवाळ, शेख शमीम पाशा, मिना घोडके आदींनी केली.
जोडप्याला एक गोंडस मुलगापलायन केल्यानंतर संतोष व गंगाने एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर ते पुण्यातच खोली करून राहू लागले. संतोष एका पिकअपवर चालक होता, तर गंगा घरीच असायची. पलायन केले तेव्हा गंगा अवघ्या १४ वर्षांची होती. त्यांना सध्या १ वर्षाचा गोंडस मुलगा आहे. ताब्यात घेतल्यानंर मुलाला पोलिसांनी मायेची उब दिली.