लोकमत न्यूज नेटवर्क
केज : माहेरी गेलेल्या बायकोला सासरी पाठविण्यास सासूने नकार दिल्यामुळे आक्रमक झालेल्या जावयाने सासरवाडीत चांगलाच राडा केला. सासूला मारहाण केली; तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मेहुण्याला चावा घेत जखमी केले. या प्रकरणी मेहुण्याच्या तक्रारीवरून जावयाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील शिरूरघाट येथील रामचंद्र माणिक सांगळे यांची पत्नी ही मुंडेवाडी येथे तिच्या माहेरी गेली होती. तिला गावी परत घेऊन जाण्यासाठी जावई रामचंद्र माणिक सांगळे हे ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता सासरवाडीत गेले व आपल्या पत्नीला आताच सासरी पाठवा असा सासूकडे हट्ट धरत सासरवाडीतील घरासमोर येऊन मोठ्याने ओरडून शिव्या देणे सुरू केले. सासू-सासऱ्याच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून पत्नीस मुला-बाळासह ‘आताच गावी चल’ म्हणू लागला. त्यामुळे सासूने मुलीला आत्ताच पाठविणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सासू पत्नीला आपल्यासोबत पाठवीत नसल्याने जावई रामचंद्र सांगळे याने थेट सासूला चापटा बुक्क्याने मारहाण केली. या वेळी त्याचा मेहुणा अभिषेक बांगर हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही रामचंद्रने लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याच्या डाव्या हाताच्या दंडास व छातीच्या उजव्या बाजूला चावा घेत दुखापत केली. तसेच पत्नी व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मेहुणा अभिषेक बांगर याने केज पोलीस ठाण्यात जावई रामचंद्र सांगळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत.