नार्को टेस्टच्या मागणीवर जयंत पाटलांचं एका वाक्यात उत्तर, स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:39 PM2023-01-25T20:39:43+5:302023-01-25T20:40:30+5:30
शिक्षक मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
बीड - मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मागील सरकारने आखला होता, असा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेत थेट अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप करत यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी हे आरोप निरर्थक असल्याचं म्हटलं. तसेच, कुठल्याही नार्को टेस्टची गरज नसल्याचंही ते म्हणाले.
शिक्षक मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी, बीडमध्ये आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिक्षकांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान फडणवीस यांनी केलेल्या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत तत्कालीन विरोधीपक्ष नेत्यांबद्दल अशी कोणतीही कृती झाल्याचं निदर्शनास आले नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, सदावर्ते यांच्या म्हणण्याला काय महत्वय, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे नार्को टेस्ट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं देखील पाटील यावेळी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा कट कुठे रचला हे मी सांगतो, दिलीप वळसे पाटील तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. वळसे पाटील, अजित पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा. कट काय होता ते लक्षात येईल. मी जेलमध्ये गेल्यानंतर एक बैठक नेत्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची झाली होती. त्या बैठकीत आता जेलमध्ये असणारे संजय पांडेही होते. या बैठकीनंतर ज्याप्रकारे चौकशी चालवली होती. त्यातून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला असा आरोपही त्यांनी केला. तसेच नागपूर कनेक्शन उल्लेख यासाठी केला गेला ज्यामुळे देशहितासाठी, हिंदुस्तानासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचं होते असा आरोपही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
काय होता देवेंद्र फडणवीसांचा आरोप?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते असा आरोप फडणवीसांनी केला होता. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते असं त्यांनी सांगितले. तसेच मी दिलीप वळसे पाटलांवर कुठलाही आरोप केला नाहीये. हा जो आदेश आला होता, तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरुन आलेला होता, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.