लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी शिवारातील सीना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करताना एक जेसीबी, ट्रॅक्टर पकडला आहे. या प्रकरणी अंभोरा पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी (दि. ७) रात्री ११ वाजता धोंगडेवाडी शिवारात सीना नदीपात्रात अंभोरा पोलिसांनी ही कारवाई केली.
उपसा सुरू असल्याची माहिती समजताच पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन सीना नदीपात्र गाठले. यावेळी त्यांना एक जेसीबी, एक ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना आढळून आला. पोलिसांना पाहताच दोघेजण वाहने घेऊन पळू जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस नाईक प्रल्हाद देवडे, पोपट मंजुळे यांनी केली.
...
पोलिसांनी एक जेसीबी, एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर असा एकूण २३ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघाजणांविरुद्ध अवैध वाळू उपसाप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात आरोपी निखिल अनिल माळशिखरे, पप्पू नंदू गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विलास माळी करीत आहेत.