केज (बीड ) : तालक्यातील बोभाटी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले जात असताना शुक्रवारी (दि.२४ ) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाडसी कारवाई केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या पथकाने उत्खनन करणारे जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त केले.
केज तालुक्यातील नदी पात्रातुन अवैधरीत्या उत्खनन करुन नदी पात्रातील हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जात असल्या बाबतच्या तक्रारी नागरिकांनी अनेक वेळा केज तहसील कार्यालय केल्या आहेत. मात्र, महसूल विभागाने यावर कारवाई केली नाही. तालुक्यातील वरपगाव येथील बोभाटी नदी पात्रातून वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना शुक्रवारी रात्री मिळाली.
यावरून त्यांनी पोलीस पथकाच्या मदतीने नदी पात्रात साध्या वेषात छापा मारला. यावेळी जेसीबी चालकासह चार ट्रॅक्टर चालकांनी अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टरसह पलायन केले. पथकाने एका ट्रॅक्टरसह जेसीबी जप्त करुन पुढील कारवाईसाठी महसूल विभागाच्या ताब्यात दिले आहे. या पथकात पोलीस कर्मचारी एस. डी. राठोड, एस. डी. अंहकारे, जे. ए. शेख, डी. बी. रहाडे, एच. जी. इंगोले , व्ही. व्ही. राऊत यांचा समावेश होता.