बीड : आमच्या शेठला मुलगा झाला असून त्यानिमित्ताने गरिबांना कपडे वाटप सुरु असल्याचे सांगत दोन ठगांनी महिलेच्या अंगावरील दागिने लंपास केले. ही घटना परळीमध्ये २१ ऑगस्ट रोजी घडली.
आबिदा कशीमा पठाण (५५, रा. मलिकपुरा, परळी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शहरातील घार्णीकर रोडवर उस्मानाबाद बँकेजवळ त्या उभ्या असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. आमच्या शेठला मुलगा झाला असून त्या निमित्ताने ते गरिबांना बुरखा वाटप करत असल्याचे सांगितले. तुम्हालाही बुरखा मिळेल मात्र अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगून त्यांनी अबिदा यांना त्यांच्या अंगावरील दागिने काढायला लावले. ५३ हजार ७०० रुपयांचे दागिने घेऊन ठगांनी पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आबिदा यांनी परळी शहर ठाण्यात धाव घेतली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.