बीड : ऊसतोडणी मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या हंगामी वसतिगृहातील अनियमिमता ९ जानेवारी रोजी अचानक केलेल्या तपासणीत उघड झाली. यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अक्षम्य त्रुटी आढळलेल्या वसतिगृह चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
ऊसतोडणी मजुरांच्या पाल्यांसाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या हंगामी वसतिगृहांमध्ये बोगसगिरी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाच्या कानी पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार ९ जानेवारी रोजी अचानक तपासणी करण्यात आली. शिक्षण विभागातील यंत्रणेऐवजी कृषी, पंचायत, महिला व बालविकास आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली. मात्र तपासणी करणाऱ्या संबंधित काही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना काम सोपविल्यामुळे केवळ सोपस्कार पूर्ण पार पाडले. या तपासणीचा अहवाल ११ ते १३ जानेवारीपर्यंत जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले. तपासणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्याचे प्राप्त अहवालात म्हटले आहे. वसतिगृहांमध्ये बोगस पटनोंदणी, बायोमेट्रिक प्रिंट नसणे, भोजनाचा सुमार दर्जा, शाळा परिसर अस्वच्छ, साठा नोंदवही, रजिस्टर उपलब्ध नसणे अशा बाबी आढळून आल्या. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले. याचा एकत्रित अहवाल आल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने संबंधित दोषी वसतिगृह चालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
वसतिगृहातील पट आणि उपस्थितीत मोठी तफावत
जिल्ह्यात यावर्षी ४५७ वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर ३०४ वसतिगृहे सुरू झाली. नंतर हा आकडा २७९ वर आला. २७९ पैकी २३९ वसतिगृहांची ९ जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली. मंजुरीनुसार वसतिगृहाची पटसंख्या व तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची उपस्थिती यात मोठा फरक दिसून आला. पटसंख्या १९ हजार ६४६ असताना केवळ १६ हजार २९५ विद्यार्थी उपस्थित असल्याचे आढळले.
गैरहजर विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार
पटसंख्येच्या तुलनेत धारुर तालुक्यात ९०२, गेवराईत ४८०, वडवणीत ५३६, अंबाजोगाईत ४४८, केज तालुक्यात ३२९ तर अन्य तालुक्यात १०० ते २०० विद्यार्थीसंख्या कमी आढळली. त्यामुळे वास्तविक हे विद्यार्थी प्रत्यक्षात लाभ घेत आहेत की नाही? त्यांची केवळ पटावर नावे आहेत का? पट नोंदीत विद्यार्थ्यांचे पालक खरोखर स्थलांतरित झाले का? मुले गावातच आहेत की पालकांसोबत मुलांनीही स्थलांतर केले, याचा शोध घ्यावा लागणार आहे. यासाठी पुन्हा अचानक तपासणीची गरज आहे.
वन डे जिल्हास्तरीय तपासणी
९९ पेक्षा जास्त वसतिगृहांमध्ये कोविड-१९ च्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.
सहा वसतिगृह शाळेत चालविले जात नसल्याने अन्यत्र तपासणी करावी लागली.
१२ वसतिगृहांच्या शाळेचा परिसर तसेच भोजनस्थळ स्वच्छ नसल्याचे निदर्शनास आले.
१० वसतिगृहांमध्ये भोजनाचा दर्जा चांगला नव्हता.
सात वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या वेळी शिक्षक उपस्थित नव्हते.
चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती.