लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील फुलेपिंपळगाव शिवारातील मनकॉट जिनिंगमधील ७ पैकी ३ गंजींना आग लागून ५ ते ६ हजार क्विंटल कापसासह एका शेतकऱ्याचा टेम्पो खाक झाला. जवळपास ७० लाखांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे. माजलगाव न.प. व अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलांनी चार तासानंतर आग आटोक्यात आणली.
शहरापासून ५ कि. मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २२२ वर रामेश्वर टवानी यांच्या मालकीची मनकॉट जिनिंग आहे. या जिनिंगला बुधवारी सकाळी ९ वाजता अचानक आग लागली. येथे असलेल्या ७ पैकी ३ गंजींना आग लागून ५ ते ६ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. जिनिंगवर असलेल्या पाण्याच्या सुविधेमुळे वाढणारी आग आटोक्यात आणण्यासाठी येथील नगर परिषदेच्या अग्निशामन दलातील महेंद्र टाकणखार, दत्ता सांवत, किशोर टाकणखार, विजय पौळ, सतीश क्षीरसागर यांनी परीश्रम घेतले.
सोळंके सह. साखर कारखाना, वडवणी नगर पंचायत, गेवराई, पाथरी, मानवत, नगर परिषदेच्या अग्निशामन दलाने चार तासानंतर आग आटोक्यात आणली. जिनिंगमध्ये एकूण १० ते १२ हजार क्विंटल कापूस खरेदी केला होता. यात कापसाच्या एका गंजीला सकाळी ९ वाजता आग लागली. त्यानंतर ३ गंजी पेटल्या. तसेच माजलगाव येथील शेतकरी शिवाजी प्रभाकर भागडे यांचा कापूस विक्रीसाठी आणलेला टेंपो (एम.एच.२३ /७४०७) कापसासह पूर्णपणे जळून खाक झाला.