गारा व विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान
येवता : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येवता परिसरात दुपारच्या वेळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली . वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच इतर पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
दिवसभर उन असताना दुपारच्या वेळी अचानक वादळी वारा येउन त्या बरोबरच गारा व अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे आंबा पिकासह भाजीपाला, कडबा यासह अनेक कृषी मालाचे नुकसान झाले आहे . झाडांना चांगले आंबे लगडले आहेत . आंब्याचे उत्पादन या वर्षी चांगले होईल, अशी अपेक्षा असताना अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. अगोदरच कोरोनाच्या दुष्प्रभावाने शेतीमालाचे व भाजीपाल्याचे भाव कोसळले असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे . त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत .