बीड : काळजी करू नका, प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देईन, असे वक्तव्य आपण गंमतीने केले होते. नाशिकमधील लोकांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. तसेच, छगन भुजबळ यांनी दिलेला सल्ला मी वडिलकीच्या नात्याने स्वीकारते, असा खुलासा बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.
पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये उमदेवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बहीण तथा विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याबाबतीत विधान केले होते. प्रीतमला विस्थापित होऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका, वेळ पडली तर प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देईन, असे विधान पंकजा मुंडे यांनी केल्याने नाशिकमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगोदरच नाशिकमधील जागेचा तिढा सुटलेला नसताना पंकजा यांनी विधान केल्याने छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. नाशिकमध्ये भरपूर नेते आहेत. पंकजा यांनी बीडमध्येच लक्ष घालावे, असा सल्ला भुजबळांनी दिला होता. यावरही पंकजा यांनी खुलासा केला. नाशिकवाल्यांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. मी प्रीतमबद्दल केलेले विधान हे गंमतीचे होते. तसेच, भुजबळ हे आमच्यापेक्षा मोठे आहेत. वडिलधाऱ्यांनी कसे बोलावे, हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. मी वडिलकीचा सल्ला म्हणून स्वीकारते, असे म्हणत त्यांनी या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
धनंजय मुंडे यांच्याबाबतही वक्तव्यपालकमंत्री तथा भाऊ धनंजय मुंडे यांच्याबाबतही पंकजा यांनी वक्तव्य केले. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय यांनी विरोधात प्रचार केला. जीव तोडून विरोध केला. आता पक्षाचा निर्णय बदलला. जसा तेव्हा विरोध केला तसा आता प्रचार करत आहेत. आमच्या भूमिका या पक्षांच्या निर्णयाच्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.