लोकमत न्यूज नेटवर्कशिरूरकासार : शिरूरमध्ये पत्रकाराचे तर दहिवंडी येथे पालखी मार्गावर शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहीवंडी येथे पालखी महामार्गावर अंबादास उत्तम बडे या शिक्षकाचे घर आहे. गावात सप्ताह सुरु असला तरी कीर्तनाला न जाता परीक्षेचे पेपर तपासणी काम करत ते घरीच थांबले होते. उशिरापर्यंत हे काम केल्या नंतर ते झोपी गेले. घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
६२ हजार रोख तर एका तोळ्याचे मणिमंगळसूत्र २५ हजार, दोन तोळ्यांचे नेकलेस ५० हजार, दीड तोळ्यांचे लॉकेट ३७ हजार ५००, लहान मुलांचे दोन लॉकेट २५ हजार, चांदीचे तीन जोड ३ हजार रुपये असा मिळून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. झालेल्या प्रकारची फिर्याद अनिरुद्ध अंबादास बडे यांनी शिरूर ठाण्याला दिली. फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
त्याच रात्री शिरुर कासार शहरात पत्रकार विजयकुमार गाडेकर यांच्या घरी चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. घरात झोपलेल्या त्यांच्या आईचे दोन तोळ्यांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. चोरी झाल्याचे जाणीव होताच त्यांच्या आईने आवाज देताच चोरट्यांनी पळ काढला. शनिवारपासून दोन दिवस पत्रकार गाडेकर बाहेर गावी गेले होते. घरून मोबाईलवर त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून जबाब नोंदवला आहे.पत्रकार व शिक्षकाच्या एकाच रात्री झालेल्या चोरी प्रकरणाने पोलिसांपुढे तपाव लावण्याचे मोठे आवाहन उभे राहिले असून, शहरात चोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा प्रकार गांभीर्याने घेऊन पोलिसांनी शोध मोहीम गतिमान केली आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असा विश्वास सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी व्यक्त केला. तर नागरिकांनी देखील जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. चोरी प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेबूब काझी हे करीत आहेत.
चौकशीसाठी चौघे ताब्यातशनिवारी झालेल्या चोरी प्रकरणाचा रविवारी दिवसभर जाब जबाब घेऊन सोमवारी पहाटे सपोनि महेश टाक, पोलीस उपनिरीक्षक महेबूब काझी व त्यांचे सहकारी चोरांचा मागोवा घेत बाहेर पडले. त्यात त्यांनी चौघांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चोरी प्रकरणात किमान सहा ते सात लोकांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात असून, लवकरच तपास मोहिमेला यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.