अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. परंतु त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यांच्या पदरी निराशाच येत असल्याने टोमॅटोचा तर लाल चिखल करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शहराच्या आजुबाजूला असलेल्या ग्रामीण भागातून दररोज सकाळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मोरेवाडी परिसर, मोंढारोड, सायगाव नाका, आंबेडकर चौक, अण्णा भाऊ साठे चौक या ठिकाणी दररोज सकाळी भाजीपाला बाजार भरतो. गेल्या काही दिवसात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी दरात हा भाजीपाला मिळत असला तरी, शेतकरी वर्गाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. कष्टाने उत्पादन करूनही त्यांच्या उत्पादनास हवा तसा भाव मिळत नसल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
मोठ्या आशेने शेतात टोमॅटोची लागवड केली होती. पावसामुळे पीकही चांगले आले. पण आता टोमॅटोला २५ रुपयांपेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.
- हनुमंत जगताप, शेतकरी
शेतात वांगी, बटाटे यासह मेथी, पालक, चुका तसेच इतर भाजीपाला लागवड केली होती. भाजीपाल्याचे उत्पादनही चांगले आले. पण आता बाजारात आवक वाढल्याने मालाला भाव नाही. अर्ध्या किमतीत मालाची विक्री करावी लागत आहे.
- रवींद्र देवरवाडे, शेतकरी
ग्राहकांच्या खिशाला झळ
बाजारात भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी, प्रत्यक्षात त्याचा फायदा मात्र ग्राहकांना मिळत नाही. फार तर दोन ते तीन रुपये कमी दराने हा भाजीपाला विक्री केला जात आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे.
- प्रशांत शेलमुकर, अंबाजोगाई
भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु यामध्ये शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान आहे. प्रत्यक्षात ग्राहकालाही याचा विशेष फायदा होत नाही. परंतु नुकसान होऊ नये.
- आनंद टाकळकर, अंबाजोगाई
दरात एवढा फरक का?
शेतकरी वर्गाकडून मोठे भाजीपाला विक्रेते एकाचवेळी सर्व माल खरेदी करतात. त्यावेळी बोली लावताना दर पाडून मागितले जातात. शेतकरीही एकाचवेळी सर्व माल देऊन टाकतात. परंतु हाच माल पुन्हा ग्राहकांना देताना दर वाढविला जातो. व्यापारी वाहतूक खर्च, इतर बाबी लावतात. त्याही पुढे किरकोळ विक्रेते आपलीही कमाई म्हणून दरामध्ये वाढ करतात. सामान्यांच्या खिशातून मात्र पैसे काढले जातात.
कोणत्या भाजीला काय भाव...
भाजीपाला - शेतकऱ्यांचा भाव - ग्राहकाला मिळणारा भाव
वांगी - २५ - ४०
टोमॅटो - २५ - ४०
मेथी - २० - ४०
चवळी - ३० - ६०
पालक - २० - ४०
गवारी - ४० - ६०
पत्तागोबी - ३० - ५०
हिरवी मिरची - ४० - ६०
दोडका - ४० - ६०
शेवगा - ३० - ४०
भेंडी - ३० - ५०