लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील कडा ते देवळाली हा १४ किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. सध्या हा रस्ता असून अडचण नसून खोळंबा.. अशा प्रकारे झाला आहे.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना मात्र गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? हे या रस्त्यावरून जाताना कळत नाही. अनेक वेळा रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक जण या रस्त्यावर जखमी झालेले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. राजकीय पुढारी या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कडा ही मुख्य बाजारपेठ असल्याने या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने लोकांचे कंबरडे मोडण्याची वेळ या रस्त्यामुळे आली आहे. निवडणुका आल्या की राजकीय पुढारी मात्र मतदानासाठी लोकांच्या दारात जातात. मात्र या रस्त्यावरील खड्डे त्यांना दिसत नाहीत काय? असा प्रश्न मयूर चव्हाण, सुरेश कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
240921\nitin kmble_img-20210924-wa0025_14.jpg
कडा-देवळाली रस्त्यावर डोंगरगणनजीक रस्त्यावरील खड्ड्यात साचलेले पाणी