केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 07:13 PM2019-07-02T19:13:09+5:302019-07-02T19:14:51+5:30

विधानसभा काउंटडाऊन : विधानसभेत सलग पाच वेळा विमल मुंदडा विजयी

In the kaij Assembly, the BJP won three times, the NCP four times and the Congress won five times | केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

केज विधानसभेत भाजप तीनदा, राष्ट्रवादी चारदा तर काँग्रेसने पाच वेळेस जिंकली निवडणूक

Next
ठळक मुद्देकेज विधानसभा मतदारसंघात एकूण ३,५५,२७८ मतदार आहेत. यात पुरूष १,८६,३१६ तर महिला १,६८,९६२ मतदार आहेत.

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई (बीड ) : लोकसभेची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालिम ठरल्याने केज विधानसभा मतदारसंघात राजकीय समिकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. १९६२  पासून आतापर्यंत १३ निवडणुका झाल्या. यापैकी काँग्रसने पाच, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजपा तीन वेळा तर एक वेळा अपक्षाने ही निवडणूक जिंकली. मात्र, या मतदारसंघातून डॉ. विमल मुंदडा यांनी भाजपाकडून दोनदा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन वेळा असे सलग पाच वेळा निवडून येऊन मतदारसंघात विक्रम प्रस्थापित केला. 

केज विधानसभा मतदारसंघात एकूण ३,५५,२७८ मतदार आहेत. यात पुरूष १,८६,३१६ तर महिला १,६८,९६२ मतदार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सलग चारवेळा बाजी मारली. सन १९९० पासून ते २००९ अशा पाचपैकी दोन वेळा भाजपाकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डॉ. विमल मुंदडा निवडून आल्या. २०१२ साली डॉ. विमल मुंदडा यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे २०१२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले. असा सलग चारवेळा केज विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिला. २०१२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पृथ्वीराज साठे यांना ८५,७५० भाजपच्या संगिता ठोंबरे यांना ७७,४४४ असे मते मिळाली होती. तर २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आला. भाजपच्या प्रा. संगिता ठोंबरे यांना १,०६,८३४ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा ६४,११३ मते मिळाली. 

केज विधानसभा मतदार संघाने सर्वच पक्षांना निवडणुकीत स्थान दिले. मात्र केज विधानसभा मतदार संघ आजही विकासापासून वंचित आहे. गेल्या २० वर्षांपासून मतदारसंघातील जुनेच प्रश्न कायम राहिले आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत ऐरणीवर येतो आणि निवडणूक झाली की हा प्रश्न बाजूला पडतो. मांजरा धरण केजकरांच्या भूमित आहे पण याचा मोठा फायदा लातूरकरांनाच होतो. धरणाचे सर्व कामकाज लातूरहून व लातुरकरांच्याच इशाऱ्यावर चालते. धरणासाठी शेत जमिनी देऊन भूमिहिन झालेल्यांना साधे कार्यालयलही या परिसरात उपलब्ध नाही. ही या मतदारसंघासाठी मोठी शोकांतिका आहे. याबाबत आजतागायत लोकप्रतिनिधींची भूमिका बोटचेपेपणाचीच ठरते.  मतदारसंघात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते पण यावर कायमस्वरुपी उपाययोजना झाली नाही. अंबाजोगाईकरांना महिन्यांतून किमान दोन ते तीन वेळा पाणी मिळते. अंबाजोगाईचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी बुट्टेनाथ साठवण तलाव होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, हा प्रस्ताव वर्षानुवर्षे मंत्रालयात धुळखात पडून आहे. काळवटी साठवण तलावाची न वाढलेली उंची, मराठी भाषेच्या विद्यापीठाचा रखडलेला प्रश्न, अंबाजोगाई ते घाटनांदूर हा  रेंगाळत पडलेला रेल्वेमार्ग, अंबाजोागईच्या वैद्यकीय महाविद्यालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. वैद्यकीय शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या २०० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. अशा अनेक समस्या भेडसावणाऱ्या ठरत आहेत. औद्योगिक विकासाबाबत मात्र हा मतदारसंघ कायम पडला आहे.  जिथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. तिथे औद्योगिक विकासाचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

केज विधानसभा मतदारसंघ
निवडणूक    विजयी    पक्ष    मते    पराभूत    पक्ष    मते
वर्ष    उमेदवार            उमेदवार
१९६२    गोविंदराव गायकवाड    भाराकाँ     ११८४३    बाबूराव आबाराव    आरईपी    ४१७१
१९६७    एस. ए. सोळंके    भाराकाँ     १९५२१    जी. एम. बुरांडे    भाकपा (मा)    १६७०३
१९७२    बाबूराव आडसकर    भाराकाँ     ३८४१६    बापू काळदाते    ससोपा    १८४१७
१९७८    भागूजी सातपुते    अपक्ष    १९०१०    शानराव थोरात    अपक्ष    १३१५४
१९८०    गंगाधर स्वामी    भाराकाँ (यु)    ३०९३७    वीणा खारे     भाराकाँ आय    ७१३७
१९८५    भागुजी सातपुते    भाकाँ (सो)    ३२९६७    अनंत जगतकर    भाराकाँ     २४०९६
१९९०    डॉ. विमल मुंदडा    भाजप    ३५९५७    भागुजी सातपुते    भाराकाँ     २६७३६
१९९५    डॉ. विमल मुंदडा    भाजप    ७२३०८    भागुजी सातपुते    भाराकाँ     ३१९७८
१९९९    डॉ. विमल मुंदडा    रा.काँ.    ८१३५४    देवेंद्र शेटे    भाजप    ३५५१९
२००४    डॉ. विमल मुंदडा    रा.काँ.    ८६७२०    चंद्रशेखर वडमारे    भाजप    ५९३८०
२००९    डॉ. विमल मुंदडा    रा.काँ.    ११०४५२    व्यंकटराव नेटके    भाजप    ६६१८८
२०१२    पृथ्वीराज उर्फ रोमन साठे    रा.काँ.    ८५७५०    टी.एस.व्ही. प्रकाश    भाजप    ७७४४४
२०१४    संगीता विजयप्रकाश ठोंबरे    भाजप    १०६८३४    नमिता अक्षय मुंदडा    राकाँ    ६४११३

Web Title: In the kaij Assembly, the BJP won three times, the NCP four times and the Congress won five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.